देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले – खा. ओमराजेंची टिका

Spread the love

देवेंद्र फडणवीस व भाजपची विरोधी पक्षात असताना परिक्षा फीबाबत वेगळी भुमिका असायची पण सत्तेच्या खुर्चीत बसल्यानंतर त्याच्या विरोधी वक्तव्ये करुन विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचे मत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यानी व्यक्त केले. धाराशिव फाऊंडेशन व शिवसेनेच्या ठाकरे गटाकडुन रोजगार मेळावा (ता.दहा) रोजी आयोजीत केला होता. त्यावेळी ते बोलत होते.
धाराशिव शहर व तालुक्यासह जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी शिवसेनेच्यावतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नोकरी महोत्सव आयोजित केला. महोत्सवात महाराष्ट्रातील 35 कंपन्यांमार्फत बेरोजगार युवक, युवतीची पात्रतेनुसार निवड करण्यात आली आहे. तब्बल नऊशे तीस विद्यार्थ्यांना त्याच ठिकाणी नोकरीचा लाभ दिल्याने हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला आहे. ज्यांना नोकरी मिळाली नसली तरीही अशा युवक, युवतींना जॉब कार्डचे वितरण करण्यात आले आहे. यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यात आली होती,त्यात पाच हजार दोनशे आठरा उमेदवारांनी नोंद केली होती . त्यामध्ये काही ऑफलाईन असलेले उमेदवारही आले असुन त्यानाही जॉब कार्ड देण्यात आले आहेत. जॉब कार्डमुळे त्या विद्यार्थ्यांना कोणत्या जिल्ह्यात कोणत्या पदाची कोणत्या कंपनीतील जाहीरातीची माहिती संदेशाद्वारे मोबाईलवर मिळणार आहे. या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थितीत पुष्पक मंगल कार्यालय येथे पार पडला.

यावेळी राजेनिंबाळकर म्हणाले की, बेरोजगार युवकाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, नोकरीसाठी पात्रता थोडी पण त्याहुन कितीतरी अधिक शिकलेल्या मुले नोकरी मिळविण्याच्या रांगेत पाहयला मिळत आहे. त्यात सरकार युवकांची परिक्षा फी व प्रक्रियेवरुन एकप्रकारे थट्टा करीत असल्याची टिकाही त्यानी केली, तलाठी परिक्षाची फी एक हजार रुपये केली हेच भाजपचे मंत्री सुधीर मुनगंठीवार 600 रुपये फि असल्याच्या कारणावरुन सभागृहात पोटतिडकीने विद्यार्थ्यांची बाजु घेत होते. पण सत्तेच्या खुर्चीत बसल्यानंतर भाजपच्या राज्याचे प्रमुख नेते एक हजार रुपये फि केल्याचे समर्थन करत आहेत. शिवाय सभागृहात बोलताना त्यानी विद्यार्थी खाजगी कोचींगसाठी पन्नास हजार रुपये फि भरत असल्याचे विधान केले. उपस्थित विद्यार्थ्यांपैकी असा क्लास असलेला कोण आहे का असा सवाल यावेळी केला तेव्हा त्यानी श्री. फडणवीस यांना विनंती केली तुम्हीच येऊन वास्तव पहा असा टोला लगावला.
आमदार कैलास पाटील म्हणाले की, सरकारी नोकरी कमी होत आहेत सरकार सगळ्याच विभागामध्ये खाजगीकरणाचा घाट घालत आहे. त्यामुळे आता आपणही खाजगी कंपनीच्या नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. पुढील काळात शहरासह जिल्ह्यातील एमआयडीसी मध्ये अनेक मोठ्या कंपन्या आणण्यासाठी निश्चितपणे प्रयत्नशील राहु, कंपन्या आल्यास निश्चितपणे रोजगार मिळविण्याचा मार्ग मोकळा मिळेल. महाविकास आघाडी सरकारच्या काळात जिल्ह्यात कृषी आधारीत उद्योग येण्यासाठी मोठ्या सवलती दिल्या आहेत, त्यामुळे भविष्यात अशा कंपन्याही येथे याव्यात यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार पाटील यानी यावेळी सांगितले.

यावेळी युवासेना सचिव अक्षय ढोबळे ,युवतीसेना सचिव मनीषाताई वाघमारे ,तालुकप्रमुख सतीश सोमानी ,विकास मोळवणे ,शहरप्रमुख सोमनाथ गुरव तसेच शिवसेना ,युवासेनाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!