21 सप्टेंबर रोजी “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी” कार्यक्रम

Spread the love

धाराशिव

जिल्हा परिषद दिव्यांग कल्याण विभाग तसेच जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने ‘दिव्यांग कल्याण विभाग’ दिव्यांगांच्या दारी हा कार्यक्रम जिल्ह्यात 21 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आयोजित करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली. ‘ दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी ‘ या उपक्रमाची आढावा बैठक 7 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाच्या प्रकल्प संचालक प्रांजल शिदे.जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुर्यकांत भुजबळ,शिक्षणाधिकारी सुधा साळुंखे,सर्व तहसीलदार,सर्व गटविकास अधिकारी,सर्व विभाग प्रमुख,जिल्हा रुग्णालयाचे प्रतिनिधी डॉ. राउत,प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे,वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते भारत कांबळे,जिल्हा दिव्यांग पुर्नवसन केंद्राचे प्रकल्प संचालक विजय कान्हेकर,महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष प्रदीप डोके,दिव्यांग संघटनेचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शिंदे,दिव्यांग शाळेचे मुख्याध्यापक व कर्मचारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे यावेळी म्हणाले, ‘ दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी ‘ हा जिल्हास्तरीय कार्यक्रम शासनाच्या राज्यस्तरीय मुख्य मार्गदर्शक आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात औरंगाबाद रोडवरील छायादिप लॉन्स मंगल कार्यालय येथे 21 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमात जिल्ह्यातील 3 ते 4 हजार दिव्यांग लाभार्थी उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागाने योग्य नियोजन करावे. याठिकाणी विविध विभागाच्या योजनांची माहिती देण्यासाठी 35 ते 40 स्टॉलची व्यवस्था करण्यात आली आहे.कार्यक्रमस्थळी भोजन,नाष्टा व पाण्याची तसेच स्टेजवर जाण्यासाठी रॅम्पची व्यवस्था करण्यात येणार आहे. याठिकाणी 20 दिव्यांग लाभार्थ्यांना मुख्य कार्यक्रमांच्या ठिकाणी विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग बांधवांना मुख्य कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील पंचायत समिती येथे सकाळी 7 वाजेपासून वाहनांची व बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.तसेच नगरपालिका क्षेत्रात खाजगी वाहने तसेच बसने दिव्यांग बांधवांना आणण्यात येणार आहे.
बसमध्ये दिव्यांगासाठी स्वयंसेवकांची तसेच डॉक्टरांची नियुक्ती केली आहे.जे दिव्यांग बांधव कार्यक्रमास उपस्थित राहू शकत नाही त्यांच्यासाठी पंचायत समिती कार्यालय,ग्रामपंचायतमध्ये मुख्य कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणासाठी युट्यूबवर लिंक उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
मेळाव्यासाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचे उद्धाटन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे व जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले.हा चित्ररथ प्रत्येक तालुका, वाड्या,वस्त्यावर जाऊन जनजागृतीचे काम करणार आहे.

कार्यक्रमात शासनाचे सर्व विभाग, सर्व शासकीय यंत्रणा, दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या अशासकीय संस्था एकाच ठिकाणी उपस्थित राहून दिव्यांगांच्या तक्रारी जाणून घेणार आहे. तसेच दिव्यांगांना आवश्यक सर्व प्रमाणपत्रे, दिव्यांगत्वाचे युडीआयडी कार्ड, प्रमाणपत्र,मतदान कार्ड वाटप, रेशनकार्ड वाटप,संजय गांधी निराधार योजना लाभ प्रमाणपत्र,घरकुल,बीज भांडवल वाटप तसेच वैयक्तिक लाभाचे वितरण,जात प्रमाणपत्र व अन्य आवश्यक त्या प्रमाणपत्रांचे वाटप तसेच शासकीय योजनातून, सामाजिक संस्था व सी.एस.आर. मार्फत उपलब्ध झालेली दिव्यांगांना लागणारी विविध उपकरणांचे वाटप करण्यात येणार आहे.
मेळाव्याच्या ठिकाणी लावण्यात येणाऱ्या स्टॉलच्या माध्यमांतून विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी दिव्यांगांचे अर्ज भरून घेण्यात येतील.तसेच आधारकार्ड,रेशनकार्ड, जात प्रमाणपत्र,उत्पन्नाचे दाखले,अधिवास प्रमाणपत्र यासह विविध प्रमाणपत्रांसाठी नोंदणी तसेच विविध महामंडळे व शासकीय विभागांकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे अर्ज यावेळी भरून घेण्यात येणार आहेत.दिव्यांगांच्या सोईसाठी याठिकाणी दुभाषिकाची तसेच स्वयंसेवकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रमाला जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी उपस्थित रहावे,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुर्यकांत भुजबळ यांनी या उपक्रमाची माहिती दिली.बैठकीस विविध विभागांचे विभागप्रमुख तसेच विविध दिव्यांग संघटनेचे प्रतिनिधी व दिव्यांग शाळेचे अध्यक्ष दिव्यांग शाळेचे मुख्याध्यापक यावेळी उपस्थित होते.

                               

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!