परंडा
धाराशिव जिल्ह्यात पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच दारूच्या नशेत हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
सदरील घटना परंडा तालुक्यातील शेळगाव येथे घडली असून, या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. गौरी ज्ञानेश्वर जाधव असे मृत मुलीचे नाव आहे. पोलीसांनी आरोपी बाप ज्ञानेश्वर जाधव याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
शेळगाव येथील ज्ञानेश्वर जाधव याला दारूचे व्यसन जडले होते. त्याच्या या व्यसनामुळे त्याची मुलगी गौरी ही आपल्या आज्जीसोबत राहत होती. गौरी गावातीलच शाळेत इयत्ता चौथी वर्गात शिकत होती. दोन दिवसांपूर्वी तिची आज्जी घरी नसताना, दारूच्या नशेत असलेल्या ज्ञानेश्वरने गौरीवर कुऱ्हाडीने हल्ला केला. डोक्यात जबर घाव बसल्याने गौरीचा जागीच मृत्यू झाला.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरी वारंवार आजारी पडत होती. याच कारणावरून बाप ज्ञानेश्वरने तिची हत्या केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्याच्या दारूच्या व्यसनामुळेच त्याने हे राक्षसी कृत्य केल्याचे स्पष्ट झाले आहे.
हत्येनंतर आरोपी ज्ञानेश्वरने पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र, घरी परतलेल्या आजीच्या सतर्कतेमुळे हा प्रकार धक्कादायक उघडकीस आला असून पुढील अधिक तपास पोलीस करत आहेत.