शिर्डी (अमर चोंदे)
सामाजिक बांधिलकी आणि सेवा-वृत्तीचा एक उत्कृष्ट नमुना सादर करत, ‘आत्मा मालिक’ संस्थेच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने ‘व्हॉइस ऑफ मिडिया’ या पत्रकार संघटनेसोबत एक करार केला आहे. या कराराअंतर्गत ‘व्हॉइस ऑफ मिडिया’ संघटनेचे पदाधिकारी, सदस्य आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोफत आरोग्यसेवा देण्यात येणार आहे.ही घोषणा नुकत्याच पार पडलेल्या ‘व्हॉइस ऑफ मिडिया’च्या शिर्डी येथील कॅडर कॅम्पमध्ये करण्यात आली. कार्यक्रमात आत्मा मालिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्री. सुनील पोकळे यांनी हा करारपत्र व्हॉईस ऑफ मिडियाचे आरोग्य विभागप्रमुख श्री. भीमेश मुतुला यांच्याकडे औपचारिकपणे सुपूर्त केला. या प्रसंगी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांच्यासह अनेक मान्यवर, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.‘आत्मा मालिक’ हॉस्पिटलची सामाजिक बांधिलकीमहाराष्ट्रातील शिर्डी कोकमठाण येथे स्थित ‘आत्मा मालिक’ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे केवळ एक वैद्यकीय सेवा केंद्र नसून, समाजासाठी समर्पित अशी सेवा-प्रवृत्ती असलेली संस्था आहे. उच्च दर्जाचे वैद्यकीय तज्ज्ञ, अत्याधुनिक यंत्रसामग्री, आणि रुग्णकेंद्रित सेवा हे या संस्थेचे मुख्य वैशिष्ट्य आहे.‘आत्मा मालिक’ हॉस्पिटलने आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत – ज्यामध्ये मोफत आरोग्य शिबिरे, ग्रामीण भागांतील आरोग्य तपासणी मोहीम, वृद्धांसाठी आरोग्य सेवा, आणि विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती कार्यक्रम यांचा समावेश आहे.पत्रकारांसाठी आरोग्य सुरक्षा – काळाची गरजपत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. त्यांचे काम सातत्याने धकाधकीचे, अपघात-जोखमीचे आणि मानसिक ताणाचे असते. या पार्श्वभूमीवर त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आरोग्य सुरक्षा देण्याची ही संकल्पना खर्या अर्थाने काळाची गरज आहे. ‘आत्मा मालिक’ संस्थेच्या या निर्णयामुळे पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दिशेने एक भक्कम पाऊल उचलण्यात आले असल्याचे व्हाईस ऑफ मिडिया संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी सांगितले.‘व्हॉइस ऑफ मिडिया’च्या नेतृत्वाचे स्वागत‘व्हॉइस ऑफ मिडिया’ या देशभरातील पत्रकारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनेने या सामाजिक उपक्रमासाठी पुढाकार घेतल्याबद्दल अनेक क्षेत्रातून कौतुक होत आहे. आरोग्य विभागप्रमुख श्री. भीमेश मुतुला यांनी या करारामुळे पत्रकारांना दिलासा मिळेल, असे सांगितले. संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्यांनी याचे स्वागत करत आत्मा मलिक संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.या उपक्रमामुळे केवळ पत्रकारांनाच नव्हे, तर समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होणार असून, इतर संस्थांसाठीही ही एक प्रेरणादायी दिशा ठरणार आहे. समाजसेवेचा खरा अर्थ अशा उपक्रमांतूनच स्पष्ट होतो.