धाराशिव
तालुक्यातील वरवंटी परिसरात असलेली महादेव टेकडी हे ठिकाण चांगला आहे. परंतू यावर फारशी झाडे दिसत नाहीत. भविष्यामध्ये हे अतिशय नयनरम्य ठिकाण होईल असा ठाम आत्मविश्वास जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी व्यक्त केला. उस्मानाबाद तालुक्यातील वरवंटी परिसरात असलेल्या महादेव टेकडी येथे आर्ट ऑफ लिव्हिंग, जिल्हा पोलीस प्रशासन व ग्रामस्थांच्यावतीने या टेकडी व परिसरात २० हजार विविध देशी वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. त्या लागवडीचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ . ओम्बासे व पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव, जिल्हा परिषदे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन भोसले, पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर, आर्ट ऑफ लिव्हिंगचे रामभाऊ सोनटक्के, उपसपंच इंद्रजीत देशमुख, उत्तम बेद्रे, ग्रामसेवक विवेक मटके, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष संतोष बेद्रे, कचरू शेख, हुसेन शेख, सपोनि शामकुमार डोंगरे, सपोनि सचिन पंडित, सपोनि अमोल पवार, सपोनि सिध्देश्वर गोरे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, या टेकडी परिसरामध्ये २० हजार विविध वृक्षांची लागवड करण्यात येणार असून आज २ हजार वृक्ष लागवड करण्यात आली आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. तसेच वृक्षांपासून छाया मिळण्याबरोबरच फळे व फुले मिळून पशु पक्ष्यांसह नागरिकांना देखील फायदा होतो. यंदा पाऊसमान कमी असले तरी ही झाडे जगविण्यासाठी सर्व गावकऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. तर पोलीस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले की, जिल्ह्यातील वृक्षांचे प्रमाण वाढावे यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. तर महादेव टेकडीवर महादेवाची पिंड असून परिसराची दीड महिन्यापूर्वी पाहणी केली होती. त्यामुळे येथे पर्यटनस्थळ होऊ शकते. या ठिकाणी वृक्ष लागवड करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. या उपक्रमास गावकऱ्यांचा देखील भरघोस प्रतिसाद मिळत असून त्यांच्या सहकार्यामुळे ही वृक्ष लागवड केली जात आहे. येथे पिंपळ, वड, औदुंबर, कैलाशपती, आंबे, चिंच, पेरु, उंबर, चिकू आदींसह २५ प्रकारच्या वृक्षांची लागवड केली जात आहे. हा परीसस नैसर्गिक असून लवकरच याचे हिल स्टेशनमध्ये रुपांतर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने ओंबासे व कुलकर्णी यांचा वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला. तर डॉ ओंबासे व कुलकर्णी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशांत पाटील, अग्निवेश शिंदे, शाम सरवदे, महिला पोलिस हवालदार एस.एस. जाधव, के.बी. साठे, पी.एस. कासार, बी.बी. झोरी, ए.एन. म्हेत्रे, मुक्ता कदम आदींसह ग्रामस्थ, आर्ट ऑफ लिव्हिंगचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.