धाराशिव
राज्य सरकार आणि राज्याचे माहिती महासंचालनालय विभाग यांच्या माध्यमातून पत्रकारांच्या अनेक मागण्यांसाठी आज राज्यभरात साडेचारशे ठिकाणी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याच्या माहिती ब जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक जयश्री भोज यांना भेटून निवेदन देत या मागण्या मान्य कराव्यात यासाठी आग्रह धरण्यात येणार आहे.
गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारांचे अनेक, सहज सुटणारे विषय तसेच प्रलंबित आहेत. या प्रश्रासंदर्भातल्या मागण्या व्हॉइस ऑफ मीडिया ‘ने वारंवार केल्या, आंदोलने केली, पण त्याला यश आले नाही. आता या मागण्या अजून लावून धरल्या जाणार आहेत. व्हॉइस ऑफ मीडिया ‘ राज्यमर आंदोलन करत त्या’ मागण्या पुढे नेत आहे. आज दि. २८ ऑगस्ट रोजी सकाळी १0 ते ५ वेळेत हे आंदोलन होणार आहे. राज्यातल्या सर्व तालुका, जिल्ह्याच्या, तहसीलदार, जिल्हा अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी यांना निवेदन देऊन त्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सरकार आणि प्रशासन यांनी पत्रकारांच्या रास्त असणाऱ्या मागण्याविषयी विचार करून, त्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी हे आंदोलन आहे.
सर्व ठिकाणी वेगाने वाढणाऱ्या आणि भविष्यात पत्रकारितेची नांदी असणाऱ्या सोशल मीडिया पत्रकारितेसाठी तातडीने जाहिरातींबाबत पॉलिसी बनवावी. सोशल मीडियांनाही जाहिराती देण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा. ज्यांनी पत्रकारितेत किमान दोन वर्ष पूर्ण केली आहेत, अशा प्रत्येक पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांना विमा सुरक्षा कवच देण्यासंबंधीच्या सूचना प्रत्येक नोंदणी असलेल्या माध्यमाच्या मालकांना देण्यात याव्यात. सरकार आणि राज्य कामगार विभाग यांना या सूचनांचे पालन काटेकोर करण्याबाबत मार्गदर्शिका द्यावी. या मागण्या प्रामुख्याने यामध्ये आहेत. या आंदोलनात सर्व पदाधिकारी, सदस्य, पत्रकार यांनी सहभागी व्हावे, असे आवहान राज्य कोर टीम, व्हाईस ऑफ मीडिया ‘चे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, राज्य उपाध्यक्ष संजय मालानी, राजेंद्र थोरात, अजितदादा कुंकूलोळ, विनोद बोरे, जयपाल गायकवाड, इरफान सय्यद, मुंबई विभागीय अध्यक्ष सुरेश ठमके, मराठवाडा अध्यक्ष विजय चोरडीया, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.