मतदान प्रक्रियेत महिला व नवमतदारांना सहभागी करुन घेतले जाणार जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे
धाराशिव
लोकशाहीचा पाया भक्कम करण्यासाठी मतदान प्रक्रिया सदृढ आणि पारदर्शक असणे आवश्यक आहे. मतदान प्रक्रियेत सर्वांचा समावेश असावा आणि एकही पात्र नागरिक मतदानापासून वंचित राहू नये या उद्देशाने अधिकारी आपल्या दारी या उपक्रमांतर्गत मतदार नोंदणी सुरु असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे म्हणाले.
या निमित्ताने जिल्हाधिकारी स्वत: बँक कॉलनी येथे विठ्ठल गंगावणे यांच्या घरी जाऊन येथील नवमतदार आणि महिला मतदारांना मतदान ओळखपत्र वितरित केले तसेच मतदार नोंदणी अर्जही भरुन घेतले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता, तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे, मतदार नोंदणी अधिकारी गजभार शंकर, पवन तावरे आदी उपस्थित होते.
भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 21 जुलै पासून घरोघरी जाऊन मतदार नोंदणी, नाव दुरुस्ती किंवा बाहेरगावी राहणारे किंवा मृत्यु झालेल्यांची नावे वगळणे आदी कार्यक्रम पुढील एक महिनाभर चालणार आहे. मतदार यादी शुध्दीकरणाचा कार्यक्रम बाबत सर्व तालुक्यात प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला आहे.
मतदार नोंदणी अधिकारी (बीएलओ) हे प्रत्येक घरोघरी जाऊन 18 वर्षावरील सर्व नागरिकांची मतदार यादीत नोंद घेण्याचे काम करणार आहेत. तसेच महिला मतदारांचा मतदार यादीत जास्तीत जास्त समावेश करुन त्यांचा निवडणूकीत सहभाग वाढविण्याचे काम हे मतदार नोंदणी अधिकारी करणार आहेत.
नागरिकांनी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना योग्य ती माहिती देऊप अचूक मतदार यादी बनविण्यास सहकार्य करावे, असेही यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले.
स्थलांतरित नागरिेकांची माहिती तपासून त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्याचे कामही केले जाणार आहे. स्थलांतरित नागरिकांची योग्य माहिती नागरिकांनी द्यावी. जे नागरिक एका ठिकाणी किमान सहा महिनेपेक्षा जास्त कालावधीकरिता रहिवासी असतील अशाच नागरिकांची त्या ठिकाणी मतदार यादीत नावे समाविष्ट केले जाणार आहेत. अन्यथा त्यांच्या नावांची नोंद मतदार यादीत केली जाणार नाही, असेही यावेळी डॉ. ओम्बासे म्हणाले.