अवैधरित्या उत्खनन, शासनाच्या शेकडो झाडांची राजरोस कत्तल, वनविभागाचे अक्षम्य दुर्लक्ष, शेकडो टनाच्या वाहतुकीचे रस्ते जमीनदोस्त
वाशी
वाशी तालुक्यात पवनचक्क्या कंपनीने मोठा हैदोस घातला आहे. परवानगी न घेता रस्त्यावर अवजड वाहनांची वाहतूक, बेकायदेशीर रित्या उत्खनन आणि मोठ्या प्रमाणात रस्त्यालगत असलेल्या झाडांच्या राजरोस कत्तली केल्या जात आहेत. शासनाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याने यामध्ये अधिकारी सामील तर नाहीत ना? असा सवाल नागरिक विचारत आहेत. शासन लाखो रुपये दरवर्षी झाडांच्या लागवडीसाठी खर्च करत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो. त्यात आपल्या जिल्ह्याची दुष्काळी भाग म्हणून ओळख आहे. ही दुष्काळी ओळख कायमची पुसण्यासाठी शासनाने व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वृक्षाची लागवड केली आहे. पण आता पवनचक्क्या कंपनीकडून पर्यावरणाचा मोठा ऱ्हास केला जात आहे. शेकडो झाडांच्या खुलेआम कत्तली केल्या जात आहे. शासन एकीकडे झाडे लावा, झाडे जगवा म्हणत आहे. तर दुसरीकडे अश्या प्रकारे झाडांच्या कत्तली केल्या जात आहे. तोडलेल्या झाडांची नुकसान भरपाई शासनाला पवनचक्की कंपनी देणार का? परवानग्या फांद्यांच्या कत्तली झाडाच्या कंपन्यांनी फांद्या तोडण्याच्या परवानगी घेतली असेल तर, प्रत्यक्ष मात्र झाडे तोडली जात आहेत. याकडे संबंधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. येत्या काळात हा पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास थांबला नाही तर पर्यावरणाचे मोठे नुकसान होईल असे, पर्यावरण प्रेमीचे म्हणणे आहे. पवनचक्की उभारण्यासाठी बेकायदेशीर रित्या कंपनीकडून मोठ्या प्रमाणात उत्खनन केले जात आहे. रस्ते शेकडो किलोमीटर चे रॉयल्टी मात्र फुटाची. पवनचक्क्या उभारण्यासाठी शेकडो किलोमीटरचे रस्ते केले जात आहे. जर कंपन्यांनी शासनाला रॉयल्टी भरली असेल तर, ती फक्त काही मीटर अंतराची प्रत्यक्ष कामे शेकडो किलोमीटर लांबची केली जात आहे. ना त्याचे मोजमाप, ना त्याचा कुठला हिशोब, ना रेकॉर्ड मग महसूल प्रशासन नेमके करते काय? असा सवाल उपस्थित होत आहे. यासंदर्भात तालुक्याचे तहसीलदार प्रकाश मेहेत्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही. तर पवनचक्की कंपन्यांकडून रस्त्यावर भल्यामोठ्या अवजड वाहनांकडून विना परवानगी वाहतूक केली जात आहे. शासन दरवर्षी तालुक्यातील रस्त्यावर करोडो रुपये खर्च करत आहे. चांगले रस्ते केल्याने अनेक गावे एकमेकांना जोडली जात असून तालुक्यातील दळणवळणाला चालना मिळते. पण आता त्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. पवनचक्क्या कंपन्यांकडून रस्त्यावर अवजड वाहनांची वाहतूक केली जात,असल्याने रस्त्याची मोठी दुरवस्था झाली असून रस्ते जमीनदोस्त झाले आहेत. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुरुळा उडत असल्याने नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. या संदर्भात काही अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कंपनीचे काही अधिकारी आमच्याकडे नाहरकत मागण्यांसाठी आले होती आम्ही त्यांना हरकत दिली नाही. मग यानिमित्ताने असा, सवाल उपस्थित होत आहे, की पवनचक्क्या कंपनीची इतकी मग्रुरी वाढली कशी? ना रस्त्यावर वाहतूक करण्यासाठी परवानगी, ना झाडे तोडण्यासाठी परवानगी मग कोणाच्या आशीर्वादाने हे प्रकार सुरू आहेत?

झालेल्या प्रकारावर कारवाई नाही झाल्यास पवनचक्की कंपनीच्या विरोध आंदोलने करण्यात येतील असे नागरिकांचे म्हणणे आहे. तर जिल्हाधिकारी काय कारवाई करणार पाहणे गरजेचे आहे.
“पवनचक्की कंपन्यांचे आमच्याकडे नाहरकत साठी प्रस्ताव आले होते. त्यांनी कागदाची पूर्तता न केल्यामुळे आपण त्यांना काम चालू करा म्हणून काय हरकत दिली नाही. पवनचक्की कंपनीने परस्पर आपल्या रस्त्यावर नासधूस केली असेल तर तालुक्याचे इंजिनिअरिंग पवार यांना मी सांगितले आहे,की ९५ क्र.ची कंपनीला नोटीस आजच्या आज काढून चौकशी करून अहवाल सादर करावा अश्या सूचना दिल्या आहेत. परस्पर कामे केली असतील तर पवनचक्की कंपनीकडून भरपाई घेण्यात येईल. आमच्याकडून कुठलीही परवानगी देण्यात आली नाही.”
– अमोल काळे
उपविभागीय अभियंता जिल्हा परिषद
” वाशी तालुक्यात बऱ्याच पवनचक्की कंपनी आल्या आहेत. त्यांच्याकडून विना परवानगी झाडे तोडली जात आहे. रस्त्याचे वाटुळे केले जात आहे. अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष असून संबंधित सर्व अधिकारी यात सामील आहेत. अधिकाऱ्यांनी कारवाई नाही केल्यास लवकरच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेऊन तालुक्यात सुरू असलेल्या प्रकारची तक्रार देणार आहे.”
– सुधीर घोलप
भाजप वाशी तालुका सरचिटणीस
“पवनचक्की कंपन्यांकडून जिल्हा परिषद रस्त्याचा वापर चालू आहे. मोठ्या प्रमाणात रस्ते खराब झाले आहेत. तसेच रस्त्या लगत झाडांची वृक्ष तोड चालू आहे. बेकायदेशीर रित्या उत्खन केले जात. जिल्हा परिषद रस्त्याची परवानगी न घेता बेकायदेशीर कामे केली जात आहे. यात सर्व अधिकारी सामील असून सर्वांची मिली भगत सुरू आहे. हा प्रकार नाही थांबल्यास पवनचक्की कंपन्यांच्या विरोधात आंदोलन केले जाईल.”
– उद्धव साळवी
जिल्हा परिषद सदस्य तेरखेडा