व्हॉईस ऑफ मीडियाच्यावतीने पत्रकारांच्या गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सन्मान
धाराशिव
न्यायाधीश, जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासन पीडितांना न्याय देऊन सामाजिक सलोखा जोपासण्याचे काम करतात. अगदी त्याप्रमाणेच पत्रकार देखील त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून पिडीतांना न्याय देण्याचे काम करीत आहेत. मात्र पत्रकारांच्या अनेक समस्या असून त्या समस्याला न्याय देण्यासाठी समाजातील घटक पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे सरकारनेच पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा रहायला पाहिजे असे प्रतिपादन धनंजय शिंगाडे यांनी दि. २० जून रोजी केले.
पत्रकारांच्या १० वी, १२ वी, नीट व जईईमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत पाल्यांच्या सत्काराचे आयोजन व्हाईस ऑफ मीडिया धाराशिव तालुक्याच्यावतीने धाराशिव शहरातील शासकीय विश्रामगृहात करण्यात आले होते. त्यावेळी ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती शिवाजी ज्युनिअर कॉलेज चे प्रा रवी सुरवसे, व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, महानगराध्यक्ष मल्लिकार्जुन सोनवणे, धाराशिव तालुकाध्यक्ष अमजद सय्यद व साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग मते आदी उपस्थित होते. पुढे बोलताना शिंगाडे म्हणाले की, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून त्यांनी दिलेल्या बातमीमुळेच समाजामध्ये काय सुरू आहे ? याची माहिती सर्व जनतेला मिळण्यास मोलाची मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे त्यांच्यामुळे सामाजिक व राजकीय कार्यकर्ते घडत असतात. कारण एखाद्या राजकीय किंवा सामाजिक व्यक्तीने चांगले काय काम केले ? हे पत्रकार आपल्या लेखणीतून मांडणी करतात. जर पत्रकारांनी चांगली बातमी लिहिली तर त्या पत्रकाराची कोणीही वाहवा करीत नाहीत. मात्र विरोधात असेल तर त्यांच्यावर खुनी हल्ल्यासारखे प्रकार देखील काही मंडळी करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावीपणे तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने उचित पावले उचलावीत, असे आवाहन त्यांनी केले. तर प्रमुख पाहुणे प्रा रवी सुरवसे म्हणाले की, नीट सारख्या अतिशय महत्त्वाच्या परीक्षेमध्ये पैसे घेऊन मॅनेज होऊन रातोरात मॉडेल उत्तर पत्रिका घरपोहोच होत आहेत. हा प्रकार शैक्षणिक क्षेत्रात अतिशय भयंकर असून पत्रकारांनी या बाजू मांडणे आवश्यक आहेच. तसेच यामध्ये गोरगरिबांची मुले कुठे आहेत ? याचा शोध घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तर समाजाने देखील अशा अंदाधुंद प्रकारांना वेळीच अटकाव करण्यासाठी पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे. विशेष म्हणजे शिक्षणामध्ये जे काळे बदल होत आहेत. हे अतिशय भयानक असून विद्यार्थ्यांनी देखील मर्यादित अभ्यास करुन निश्चित ध्येय गाठावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच सर्व क्षेत्रातील होणारे बदल समाजाने स्विकारले पाहिजेत असे सांगत ते म्हणाले की, पत्रकार ते बदल डोळसपणे बातमीतून दाखवित असल्यामुळे खऱ्या अर्थाने ते समाजाचे दिशादर्शक असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. विद्यार्थिनी विशाखा हरिश्चंद्र धावारे या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले. तर जिल्हाध्यक्ष बनसोडे यांनी व्हॉईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती विशद केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष अमजद सय्यद यांनी तर सूत्रसंचालन जिल्हा संघटक कुंदन शिंदे यांनी व उपस्थितांचे आभार पांडुरंग मते यांनी मानले. प्रारंभी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ वैद्य, सतीश मातने, संगीता काळे, प्रसिद्धीप्रमुख सलीम पठाण, किरण कांबळे, साप्ताहिक विंग उपाध्यक्ष जफर शेख, पत्रकार विनोद बाकले, सुधीर पवार,रामेश्वर डोंगरे, सुभाष कदम, मच्छिंद्र कदम, सचिन वाघमारे, राजेंद्र गंगावणे, अल्ताफ शेख, प्रशांत मते, प्रशांत सोनटक्के, किशोर माळी, आकाश नरोटे, मुस्तफा पठाण, रियाज शेख आदींसह पत्रकार व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या विद्यार्थी व पालकांचा झाला सन्मान
यावेळी मान्यवरांच्या हस्ते शेख फरहान रिझवान अहेमद, गौरी संतराम गाढवे, शिवम पांडुरंग मते, कैफ इस्माईल पटेल, सुप्रिया सुभाष कदम, भक्ती उमरावसिंग बायस, विशाखा हरिश्चंद्र धावारे, तमन्ना मुस्तफा पठाण, शेख तब्बसूम अब्दुल रहीम, सानिया रियाज शेख, दिग्विजय राजेंद्र जाधव व दर्शन राजकुमार गंगावणे या विद्यार्थ्यांसह पालकांना प्रशस्ती पत्र, सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मानित करण्यात आले.