मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हा संघटक सुधीर पाटील यांचे आवाहन
धाराशिव – राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री.एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील बार्शी रोडवरील हातलाई मंगल कार्यालयात शिवसेनेचा भव्य मेळावा शनिवार,दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात धाराशिव -कळंब विधानसभा मतदारसंघातील शाखांचे प्रातिनिधिक स्वरूपात फलक पूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेनेचे जिल्हा संघटक सुधीर पाटील यांनी केले आहे.
मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे शनिवारी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील बार्शी रोडवरील हातलाई मंगल कार्यालयात शिवसेनेचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याची तयारी पूर्ण झाली आहे. सुधीर पाटील यांनी गेल्या महिन्यातच शिवसेनेत प्रवेश केला असून, त्यानंतर पक्षाने त्यांच्यावर जिल्हा संघटकपदाची जबाबदारी सोपवली आहे. सुधीर पाटील यांनी शिवसेना पक्षाच्या संघटन वाढीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी महिनाभरात धाराशिव -कळंब विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांना भेटी देऊन पुन्हा एकदा पक्ष बांधणीसाठी जोर लावला आहे.त्यांच्या प्रयत्नांमुळे पक्षाला पुन्हा एकदा ताकद मिळत आहे. त्यांच्या पुढाकारातून धाराशिव येथे शनिवारी दुपारी 2 वाजता शिवसेना पक्षाचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार आहे तसेच धाराशिव -कळंब विधानसभा मतदारसंघातील विविध गावातील 190 शाखांचे उद्घाटन प्रातिनिधिक स्वरूपात फलक पूजन करून मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यावेळी विविध पक्षातील पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी शिवसेना पक्षाचे नेते तथा पालकमंत्री डॉ.तानाजीराव सावंत, आमदार ज्ञानराज चौगुले, सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, जिल्हाप्रमुख सूरज साळुंके, दत्ताअण्णा साळुंके, मोहन पणुरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यासाठी जिल्ह्यातील शिवसेना पक्षाच्या विविध शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी, शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा संघटक सुधीर पाटील यांनी केले आहे.
स्वतंत्र्यसैनिकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे. या लढ्यामध्ये धाराशिव जिल्ह्याचे मोठे योगदान आहे. अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी मराठवाडा मुक्ती दिनाच्या लढ्यात आपले रक्त सांडले तसेच बलिदानही दिले. या मराठवाडा स्वातंत्र्य संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाच्या शनिवारी होणाऱ्या मेळाव्यात जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.