धाराशिव
नगर परिषद प्रशासनाने शहरातील रस्त्याची कामे रखडून ठेवल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने धाराशिव येथे मंगळवारी (दि. 25) भर पावसामध्ये चिखलात ठिय्या मारून बोंब मारो आंदोलन करून मागणीकडे लक्ष वेधलेे. त्यानंतर आंदोलनकर्त्यांच्या वतीने मागणीचे निवेदन नप मुख्याधिकारी यांना देण्यात आले.
यापूर्वी शिवसेनेच्या वतीने नगर परिषदेच्या मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून तत्काळ शहरातील रस्त्याच्या दुरावस्थेबाबत तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली होती. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांसह महिलांना चिखलातून वाट शोधताना कसरत करावी लागत आहे. मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला होता. त्यानुसार मंगळवारी शहरातील विसर्जन विहिरीजवळ शिवसेनेच्या वतीने खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली चिखलात बसून बोंबमारो आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांच्या वतीने घोषणाबाजी करून रस्त्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आले.
दरम्यान, नगर परिषद प्रशासनाच्या वतीने लेखी पत्र देऊन सन 2020-21 व 2021-22 अंतर्गत मंजूर विकासकामांच्या निविदेतील पात्र कंत्राटदारांचे लिफाफे उघडण्यात आले असून त्यांनी सादर केलेल्या दरास मंजुरी देऊन कार्यारंभ आदेशाची प्रक्रिया करण्यात आली असल्याचे म्हटले आहे. कंत्राटदारांच्या करारनामाअंती सदर योजनेत मंजूर कामाबाबत कार्यारंभ आदेश देण्यात येणार आहे. शहरात सध्या भुयारी गटार योजनेचे काम सुरू असून प्रत्यक्ष काम झालेल्या काही ठिकाणी मजबुुतीकरणाचे काम सुरु असून उर्वरित आवश्यक ठिकाणी तातडीने मजबुतीकरणाचे काम नगर परिषदेमार्फत सुरू करण्यात येणार असल्याचे पत्र आंदोलनकर्त्यांना देण्यात आले आहे.
यावेळी नप माजी गटनेते सोमनाथ गुरव, माजी नगरसेवक बाळासाहेब काकडे, राणा बनसोडे, रवि वाघमारे,नितीन शेरखाने, बंडू आदरकर, रवि कोरे आळणीकर,पंकज पाटील, विनोद केजकर,अजय नाईकवाडी,गणेश साळुंके,अमित उंबरे, नाना घाडगे, मनोज उंबरे, संकेत सूर्यवंशी , संदीप शिंदे, शिवप्रताप कोळी, अभिराज कदम, अक्षय जोगदंड, जगदीश शिंदे, सतीश लोंढे, बाबू पडवळ , मनोज पडवळ , अमित जगधने, मुजीब काझी, साजीद सय्यद, सुमित बागल, शिवराज आचार्य यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
सत्ताधार्यांचा विकासकामाला खोडा!
धाराशिव शहरातील 2020-21, 21-22 22-23 या वर्षात तब्बल 40 ते 50 कोटी निधी मंजूरी मिळाली असुन दोन वेळेस निविदा प्रक्रिया झाली असताना जाणीवपूर्वक शिंदे फडणवीस सरकार, सत्तेतील लोकप्रतिनिधी यांनी नगर पालिका प्रशासकावर दबाव टाकून निविदा प्रक्रिया अडचण निर्माण करत विकास कामे होऊ दिली नसल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे.
यापुर्वीही शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आमरण उपोषण केले होते.तसेच शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने न्यायालयात दाद मागितली होती.परंतु प्रशासनावर दबाव टाकून निविदा प्रक्रिया रद्द केली.व फेर निविदा करण्यात आली.2021-22 व
यावर्षी ची 18 कोटी कामासंदर्भात न्यायालयात गेलो होतो.हि कामे त्याचवेळी झाली असती तर आज नागरीकांना चिखलातुन खड्डयातुन वाट शोधत जाण्याची वेळ आली नसती.जाणीवपुर्वक शिंदे फडणवीस सरकारने कामे होऊ दिली नाहीत.35 ते 40. वर्ष धाराशिव नगरपालिकेवर सत्ता भोगुन देखिल विकास कामे करता आली नाहीत.महाविकास आघाडीच्या काळात धाराशिव नगरपालिकेला मिळालेला निधी यातुन होणारी विकास कामे प्रशासनावर दबाव टाकून होऊ दिली नाहीत. भुयारी गटार योजनेची किमे झालीत याच योजनेत रस्ता दुरूस्तीसाठी 43 कोटीचा असणारा निधी वापरू न दिल्याने शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)पक्षावर रोष यावा म्हणून विकास कामाला अडथळा शिंदे-फडणवीस सरकार, सत्तेतील लोकप्रतिनिधी यांनी खोडा घातला असल्याचा आरोपही शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे.
दोन वर्षापासून रस्त्याची कामे रखडली-गुरव
राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रशासकीय मान्यता मिळालेल्या 40 ते 50 कोटीच्या कामाची मान्यता पालकमंत्री यांनी रद्द केली. पुन्हा फेरनिविदा काढण्यात आली परंतु कामे सुरु केली नाहीत . यामुळे दोन वर्षापासून रस्त्याची दूरवस्था होवून नागरिकांची मोठी गैरसोय झाल्याचा आरोप शिवसेनेचे शहर प्रमुख तथा नप माजी गटनेते सोमनाथ गुरव यांनी केला.